नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्ठात दुरुस्ती करून त्यात पाली भाषेचा समावेश करण्यात यावा, यासाठी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यसभेत खासगी विधेयक सदर केले. राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्ठात सध्या असलेल्या एकूण २२ भाषांमध्ये पाली भाषेचा समावेश नाही. आज सबंध जगात भारत हा ‘बुद्धाचा देश’ म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य माणसाला समजावे म्हणून बुद्धाने जाणीवपूर्वक आपले सर्व तत्वज्ञान पाली भाषेत सांगितले. अशाप्रकारे बुद्धाच्या संपन्न तत्वज्ञानाच्या पाली भाषेचा समावेश खरे पाहता यापूर्वीच राज्यघटनेत व्हायला हवा होता. तो नसल्यामुळे ही भाषा युपीएससी परीक्षेतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण आणि मागासवर्गीय मुलांना पाली भाषा ऐच्छिक विषय म्हणून घेता येत नाही. यापूर्वी खासदार मुणगेकर यांनी यासाठी प्रयत्न केले. परंतु ते फलदायी न ठरल्याने त्यांनी आता याबाबत घटनादुरुस्ती करणारे खाजगी विधेयकच राज्यसभेत मांडले आहे. (प्रतिनिधी)
मुणगेकरांचे पाली भाषेसाठी खासगी विधेयक
By admin | Published: April 26, 2015 2:06 AM