लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिकेची शिक्षण अधिकारी ही पती आणि दिरासह फसवणुकीचे रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती मालमत्ता कक्षाच्या कारवाईतून उघडकीस आली. प्रांजली गोसावी-भोसले असे शिक्षण अधिकारी महिलेचे नाव असून, ती मुलुंड टी वॉर्डमध्ये कार्यरत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून ती गैरहजर होती. अखेर, मंगळवारी भोसले दाम्पत्याला गोव्यातून अटक करण्यात आली. त्यांनी आतापर्यंत सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय गुन्हे शाखेला असून, त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.
पालिकेच्या विविध खात्यांत नोकरी लावण्याच्या नावाखाली तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली हाेती. या फसवणूकप्रकरणी १७ जून रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान भोसले आपल्या पदाचा गैरवापर करत पती आणि दोन दिरांच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. यात पती लक्ष्मण सर्व व्यवहार हाताळत होता. तर दीर राजेश आणि चुलत दीर महेंद्र भोसले कमिशनवर तरुण-तरुणींना त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते.
भोसले ही गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून गैरहजर होती. यात मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. तपासात ही मंडळी गोवा येथील कंडोलिम भागात लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने भोसले दाम्पत्याला अटक केली. त्यांच्या चौकशीतून ठाणे आणि कल्याण येथे राहणाऱ्या साथीदार असलेल्या दिरांची माहिती मिळताच त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
‘तुमचीही फसवणूक झाली आहे का?’भोसले कुटुंबीयामुळे शेकडो तरुणांची फसवणूक झाल्याचा संशय पथकाला आहे. फसवणूक झाली असल्यास तक्रारीसाठी पुढे या किंवा २३७८०२९९ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन मालमत्ता कक्षाने केले आहे.