गुरुग्राम: हरयाणाच्या गुरुग्राममध्य एक अजब घटना घडली आहे. महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्यानं एका सलूनवर बुलडोझर चालवला आहे. सलूनमध्य कोणतंही बेकायदेशीर काम चाललेलं नव्हतं. अतिक्रमणदेखील झालेलं नव्हतं. पण तरीही अभियंत्यानं सलूनवर तोडक कारवाई केली. कनिष्ठ अभियंत्याची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी गेली होती. पत्नीला मेकअप आवडला नाही. त्यामुळे अभियंत्यानं सलूनवर थेट बुलडोझर चालवला. प्रकरण चर्चेत येताच प्रशासनानं अभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली.
सेक्टर ३८ मध्ये असलेल्या कट स्टाईल सलूनमध्ये घडला आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राकेश कुमार त्यांची पत्नी आणि अन्य एका महिलेसोबत सलूनमध्ये आले होते, अशी माहिती सलूनचे व्यवस्थापक संदीप कुमार यांनी दिली. त्यांना हवी ती सुविधा द्या, असं सलूनच्या मालकानं सांगितलं. त्यानंतर अभियंता फेशियल करून निघून गेले. त्यांची पत्नी आणि दुसरी महिला तिथेच थांबली, असं संदीप कुमार यांनी सांगितलं.
अभियंत्याच्या पत्नीला ज्या उत्पादनाच्या आधारे मेकअप करायचा होता, ते उत्पादन सलूनमध्ये नव्हतं. कर्मचाऱ्यानं ते उत्पादन मागवण्यास सांगितलं. यादरम्यान महिलेला साडी नेसवण्याच आली. मात्र तिला ती आवडली नाही. हेअर स्टाईलदेखील तिला पसंत पडली नाही. यावरून अभियंत्याच्या पत्नीनं ब्युटिशियनसोबत गैरवर्तन केलं आणि कॉल करून पतीला बोलावलं.
बिलाचे ५ हजार रुपये न देता दोन्ही महिलांना घेऊन अभियंता तिथून निघून गेला. त्यानं एका कर्मचाऱ्याला मारहाणही केल्याचा आरोप आहे. पुढच्या १० मिनिटांत तिथे महापालिकेची गाडी आली. दुकानावरील बोर्ड त्यांनी १० मिनिटांत हटवण्यास सांगितला. त्यानंतर पथकानं बोर्ड तोडला. सलूनचं नाव असलेले काही फलक रिक्षात टाकले. ते घेऊन पथक तिथून रवाना झालं. या प्रकरणी पोलिसांनी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्याला निलंबित करण्याचे आदेश पालिका आयुक्त मुकेश कुमार आहुजा यांनी दिले आहेत.