लखनऊ : अॅपलच्या एरिया मॅनेजरला पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केल्या प्रकरणी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडले असून ही हत्या एन्काऊंटरचा भाग नाही. चौकशीचे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास सीबीआय चौकशीही केली जाईल.
अॅपलचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी कंपनीचा एक कार्यक्रम आटोपून सहकाऱ्याला सोडण्यासाठी जात असताना गोमतीनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपी कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आणि संदीप यांना अटक केली आहे. त्यांना संध्याकाळपर्यंत सोडून देण्यात येईल. दरम्यान, तिवारी यांच्या पत्नीने उत्तरप्रदेश सरकारकडे 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि पोलिस विभागात नोकरी देण्याचीही मागणी केली आहे.
यावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास सीबीआय चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. उत्तरप्रदेशमध्ये गोमतीनगर हा व्हीआयपी भाग आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितल्याचे लखनऊचे पोलीस अधिक्षक कलानिधी नैथनी यांनी सांगितले.