ही तर लोकशाहीची हत्या, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:09 AM2019-08-22T11:09:55+5:302019-08-22T11:10:45+5:30
आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चिदंबरम यांना करण्यात आलेली अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. दरम्यान, काल रात्री अटक करण्यात आलेल्या चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, '' गेल्या दोन दिवसांमध्ये देशाने प्रसारमाध्यमांमधून लोकशाहीची दिवसाढवळ्या आणि कधीकधी रात्री हत्या झाल्याचे पाहिले आहे. सध्याच्या भाजपा सरकारने ईडी आणि सीबीआयला वैयक्तिक बदला घेणाऱ्या संस्थांमध्ये परिवर्तित करून टाकले आहे. पूर्वग्रह आणि वैयक्तिक बदला घेण्याच्या भावनेतून चिदंबरम यांना ज्याप्रकारे अटक करण्यात आली त्यावरून मोदी सरकार वैयक्तिक बदला घेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, हे सिद्ध झाले.''
LIVE: Press briefing by @rssurjewala, I/C, AICC Communications. https://t.co/AnhGZzw0hF
— Congress Live (@INCIndiaLive) August 22, 2019
सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही काँग्रेसने केला. ''आज भाजपाचे सरकार देशाला भयंकर मंदीच्या लाटेतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजन करण्यात अपयशी ठरले आहे. लोक लाखोंच्या संख्येने रोजगार गमावत आहेत. रुपयाचे मूल्य घसरले आहे. प्रत्येक क्षेत्राला मंदीची झळ बसत आहे. या प्रश्नांवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या दोन दिवसांमध्ये चिदंबरम यांच्या अटकेचे नाटक रंगवले आहे.