नवी दिल्ली : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी कुठल्याही प्रकारे संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली.गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही स्पष्टोक्ती दिली. पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा परस्परांशी संबंध आहे, अशा आशयाचा कुठलाही अहवाल नाही, असे रिजीजू यांनी सांगितले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात रडारवर आलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पानसरे हत्याप्रकरणी सनातनच्या एका साधकास अटक करण्यात आल्यापासून या वादग्रस्त संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. क्रॉमेड व लेखक पानसरे यांच्यावर महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथे १६ फेबु्रवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पानसरेंची प्राणज्योत मालवली होती. यापूर्वी २० आॅगस्ट २०१३ रोजी पुरोगामी विचारवंत आणि लेखक नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती, तर ३० आॅगस्ट २०१५ रोजी कन्नड विचारवंत कलबुर्गी यांचीही कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तिघा विचारवंतांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही
By admin | Published: December 03, 2015 3:15 AM