मुलीने प्रेमविवाह केल्याने नाराज होऊन जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासऱ्यांसह पाच जणांना जयपूरमधील कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पतीची हत्या झाल्यानंतर पत्नीने न्यायासाठी लढा देत आपल्या संपूर्ण कुटुंबाला गजाआड धाडले आणि पतीला न्याय मिळवून दिला. जयपूरमध्ये गाजलेल्या या हत्याकांडाप्रकरणी मुलीचे वडील जीवनराम, आई भगवती देवी, भाऊ भगवाना राम, शूटर विनोद आणि रामदेव यांना दोषी ठरवत कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर कुटुंबातील इतर दोन सदस्यांना संशयाचा फायदा देत आरोपमुक्त केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जीवनराम याची मुलगी ममता दिने केरळमधील इंजिनियर अमित नायर याच्याशी २०१२ मध्ये कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ममता ही माहेरच्या सर्व संपत्तीवरील हक्क सोडून पतीसोबत केरळमध्ये स्थायिक झाली होती. मात्र आई-वडिलांनी कटकारस्थान करून तिला परत बोलावले. तसेत घराशेजारी राहायला घर मिळवून दिले. तसेच मुलगी आणि जावयासोबत आनंदाने राहू लागले. कुटुंबातील वाद मिटल्याने ममता आणि तिचे पती निश्चिंत होते. तसेच आई-वडिलांच्या मनात काही वेगळंच चालू असेल याची त्यांना कल्पनाही आली नाही.
या दरम्यान, आई-वडिलांनी मुलासोबत मिळून जावयाची हत्या करण्यासाठी रामदेव आणि विनोद यांना सुपारी दिली. २०१७ मध्ये सकाळी सकाळी जेव्हा अमित नायर त्याच्या घरातून बाहेर निघाला तेव्हा या शूटरनी चार गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या हत्येनंतर जीवनराम याने शूटर्सना बसमधून अजमेर येथे नेऊन सोडले. तिथून ते अहमदाबादला पसार झाले. तर या घटनेनंतर ममताचे कुटुंबीय डिडवाना गावात गेले. मात्र ममता हिला या हत्येमागे कुटुंबीयच असल्याचे समजले तेव्हा तिने आपल्याच कुटुंबीयांविरोधात न्यायासाठी लढा देत त्यांना शिक्षा दिली.