महाशिवरात्री उत्सवसाठी मुर्डेश्वर संस्थान सज्ज
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
घाटनांद्रा : १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या मुर्डेश्वर संस्थान येथील सात दिवस चालणार्या यात्रौत्सवासाठी संस्थान सज्ज झाल्याची माहिती पीठाधीश काशीगिरी महाराजांनी दिली.
घाटनांद्रा : १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या मुर्डेश्वर संस्थान येथील सात दिवस चालणार्या यात्रौत्सवासाठी संस्थान सज्ज झाल्याची माहिती पीठाधीश काशीगिरी महाराजांनी दिली.सिल्लोड तालुक्याचे कुलदैवत असलेल्या केळगाव येथील डोंगराच्या कडेवर असलेल्या मुर्डेश्वर संस्थानात परंपरेनुसार महाशिवरात्रीपासून सात दिवस मोठी यात्रा भरते. यावर्षी दि.१७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या यात्रौत्सवासाठी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवण्यात आली आहे.प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीस ऐतिहासिक महत्त्व असून, वनवासात जात असताना रामचंद्रांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून या शिवलिंगास अभिषेक केला होता. म्हणूनही या ठिकाणास धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून आजही या ठिकाणी श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस यात्रेचे स्वरूप येते. डोंगराच्या कडेवर हे हेमांडपंती पद्धतीचे बांधकाम केलेले मंदिर असून, मंदिराच्या बाजूस खान्देश प्रांताचे रोमांचक, नैसर्गिक सौंदर्य पाहावयास मिळते. म्हणून या ठिकाणी भाविकांबरोबर पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे काशीगिरी महाराजांनी सांगितले.वर्षभरात विविध धार्मिक उत्सव व अखंड हरिनामाची वीणा या ठिकाणी चालू राहते. यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने परिश्रम घेतात. शिवाय प्रत्येक दिवशी येणार्या भाविकास प्रसादाची नियमित व्यवस्था संस्थानाने भाविकांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे.दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात काशीगिरी महाराजांच्या हस्ते रुद्राभिषेक होऊन महाआरती, हरिपाठ, रात्री विविध ठिकाणांच्या महाराजांची प्रवचने व प्रसिद्ध कीर्तनकार महाजन महाराज यांचे कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.व्हॉलीबॉल, क्रिकेटच्या स्पर्धा, लोकनाट्य, तमाशा व करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले असून, यात्रेत विविध प्रकारची महिलांच्या संसारोपयोगी साहित्याची व खेळणी, प्रसादाची दुकाने यात्रेची शोभा वाढवीत आहेत. भाविकांनी या यात्रेत सहभाग घेण्याचे आवाहन संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराजांनी केले आहे.