नवी दिल्ली - अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होत आहे. अवघ्या काही दिवसांत गेल्या ३० वर्षांपासूनचे पाहिलेले रामभक्तांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामललाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल. त्यासाठी, देशभरातील अनेक मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. जगभरातून भारतीयांचा राम मंदिर सोहळ्यासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. तर, मंदिर उभारणीसाठीच्या यात्रेत, कारसेवेत सहभागी असलेल्यांसाठी हा भावूक क्षण आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही सोहळ्याचं निमंत्रण गेलं असून तेही उपस्थित राहणार आहेत.
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपींना बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये, राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सं आणि कारसेवकांचा समावेश आहे. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. तर, राम मंदिर उभारणीच्या लढ्यातील खंदे कार्यकर्ते असलेल्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेही सोहळ्यासाठी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी विषेश व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठीही विशेष यंत्रणा तैनात असणार आहे.
या दोन्ही दिग्गज नेत्यांना यापूर्वीच निमंत्रण पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, बुधवारी विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी, दोन्ही नेत्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. यापूर्वी काही नेत्यांच्या विधानामुळे राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावणारे हे दोन्ही नेते सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती. प्रकृती अस्वास्थेचं कारण देत ही अनुपस्थिती सांगण्यात येत होती. मात्र, विहिंपच्या नेत्यांनी आता फोटो शेअर करत दोन्ही नेते अयोध्येत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनाही निमंत्रण
राम मंदिर बांधकाम समितीचे प्रमुख न्रीपेंद्र मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी नागपूर येथे जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट घेतली. यावेळी, त्यांनी सरसंघचालकांना निमंत्रण पत्रिका देत, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यामुळे, आता सरसंघचालकही राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्याचं काम अंतिम टप्प्यात असून काँग्रेसने या सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं आहे. त्यावरुन, भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.