नवी दिल्ली : केंद्र सरकारसोबत थेट संघर्षाचा पवित्रा घेणारे व आपल्याला पदावरून हटविण्याच्या प्रयत्नाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे मिझोरमचे राज्यपाल अजिज कुरेशी यांना अखेर शनिवारी राज्यपाल पदावरून बडतर्फ करण्यात आले.कुरेशी यांना राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे व पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी हे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मिझोरमचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील, असे राष्ट्रपती भवनातून जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. कुरेशी यांचा कार्यकाळ मे २०१७ मध्ये संपणार होता. कमला बेनिवाल यांच्यानंतर पदावरून हटविण्यात आलेले कुरेशी हे दुसरे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांची बदली मिझोरम येथे करण्यात आली होती. परंतु त्यांनी तेथे जाण्यास नकार देत राजीनामा दिला होता. कुरेशी यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी ते उत्तराखंडचे राज्यपाल होते. केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी फोन करून राजीनामा देण्यास सांगितल्याची तक्रार कुरेशी यांनी न्यायालयात केली होती.
मिझोरमचे राज्यपाल कुरेशी यांना हटविले
By admin | Published: March 29, 2015 1:27 AM