ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 9 - जयललिता यांचं पोएस गार्डन परिसरातील निवासस्थान असलेलं वेद निलायमचं रुपांतर संग्रहालयात करण्यात येणार असल्याची माहिती तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी दिली आहे. यासाठी जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकची सुत्रे हाती घेतलेल्या शशिकला यांच्याविरोधात निदर्शन करण्यात येणार असल्याचं पनीरसेल्वम यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत शशिकला आणि त्यांचे नातेवाईक घरावरील ताबा सोडत नाहीत तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असं पनीरसेल्वम बोलले आहेत.
या संग्रहालयात अम्मांच्या सर्व आठवणी जपून ठेवण्यात येतील, जेणेकरुन सर्व वयोगटातील लोकांना त्या पाहता येतील असं पनीरसेल्वम यांनी सांगितलं आहे.
पोएस गार्डन परिसरातील वेद निलायम हा बंगला गेल्या 25 वर्षांपासून सत्तेचं केंद्र ठरला आहे. 2016 विधानसभा निवडणुकीत जयललिता यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली होती त्यामध्ये या बंगल्याचाही उल्लेख होता. 2011 मध्ये या बंगल्याची किंमत 20 कोटी 16 लाख होती, जी 2016 मध्ये 43 कोटी 96 लाखांवर पोहोचली होती.