नवी दिल्ली - घरामध्ये रिकाम्या असलेल्या खोलीचा वापर हा नानाविध कारणांसाठी केला जातो. पण याच खोलीतून लाखोंची कमाई केल्याची एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एका महिलेने आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि कष्टाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली आहे. घरातील रिकाम्या खोलीचा उत्तम वापर करून घेत मशरूमची शेती करून 3 लाखांचं उत्पन्न मिळवत आहे. सध्या या महिलेची जोरदार चर्चा रंगली आहे. गोपालगंजमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या घरामध्येच हा अनोखा प्रयोग केला आहे आणि आता तो यशस्वी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालगंज जिल्ह्यातील हथुआ येथे राहणाऱ्या रेखा देवी (Rekha Devi) यांनी आपल्या घरातील रिकाम्या खोलीचा अगदी योग्य वापर करून त्याला कमाईचं उत्तम साधन केलं आहे. रेखा देवींची मुलं मोठी होऊन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्या घरात एकट्याच राहत असतं. मोठ्या घरात त्या एकट्याच राहत असल्यामुळे घरातील बाकीच्या खोल्या रिकाम्या होत्या. या खोल्यांचा काहीच उपयोग नसल्यामुळे तिथे मशरुमची शेती करण्याची कल्पना त्यांना सुचली.
रेखा यांची आर्थिक परिस्थिती सुधारली
काही दिवसांपूर्वीच रेखा यांनी घरामध्ये करण्यात येणाऱ्या शेतीच्या प्रयोगासंदर्भात वृत्तपत्रात माहिती वाचली होती. आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कऱण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घरात मशरुमची लागवड करून त्याची देखभाल करायला त्यांनी सुरुवात केली. बघता बघता मशरूम जोमात वाढले आणि बाजारात त्याला चांगली किंमतदेखील मिळाली. पहिल्यात वर्षी रेखा देवी यांना 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. रेखा देवी यांनी सहज सुरू केलेल्या या प्रयोगाला चांगलं यश मिळालं आहे. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती कमालीची सुधारली असल्याचं त्या सांगतात.
मशरुमचे लाडू, बिस्किटं आणि लोणचं
मशरूमच्या शेतीत आपला वेळ चांगला जात असून त्यामुळे महिन्याकाठी चांगले पैसे जमा होत असल्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. मशरुमचे इतर प्रोडक्ट विकायलाही सुरुवात केली. त्या सध्या मशरुमचे लाडू, बिस्किटं आणि लोणचं देखील विकतात. त्याला ग्राहकांची जोरदार मागणी आहे. तसेच त्या आजुबाजूच्या लोकांना देखील मशरुम शेतीसंदर्भात टीप्स देतात. घरबसल्या त्यांना यामुळे आता रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांनी घरामध्ये ओएस्टर, पोर्टबेलो, हेडहॉग, शिटाके आणि बटण या मशरुमच्या इतर प्रकारांची देखील शेती केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.