वाराणसी : बनारस या आपल्या जन्मभूमीत जागतिक दर्जाची संगीत अकादमी स्थापन करण्याचे बनारस घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, ठुमरीसम्राज्ञी गिरिजादेवी यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिल्याची खंत काशीवासीयांनी व्यक्त केली.गिरिजादेवी यांचे बुधवारी रात्री कोलकात्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान व बिरजू महाराज यांच्यानंतर बनारसी संगीतातील तिसरा आणि बहुधा अखेरचा तेजस्वी तारा निखळल्याची भावना शहरातील कलाकार व संगीतप्रेमींनी व्यक्त केली.गिरिजादेवींनी आयुष्यातील उत्तरार्थ कोलकात्यात व्यतीत केले, तरी त्यांचे मन शेवटपर्यंत बनारस या जन्मगावी गुंतलेले होते. बनारसमध्ये जागतिक दर्जाची एक संगीत अकादमी सुरू करावी, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी जमीन मिळावी, म्हणून मी गेली ५० वर्षे पाठपुरावा करीत होते, परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. बनारसमध्ये मला अकादमी सुरू करता आली असती, तर कदाचित मी कोलकत्याला गेलेही नसते, असा खेद गिरिजादेवींनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत व्यक्त केला होता. संगीतप्रेमी व सहकलाकारांमध्ये ‘आपाजी’ (मोठी बहीण) या आपुलकीच्या नावाने ओळखल्या जाणा-या गिरिजादेवींनी नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडून येऊन पंतप्रधान झाल्यानंतर, अकादमीच्या संदर्भात त्यांना भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांची ती इच्छाही फलद्रूप झाली नाही. (वृत्तसंस्था)>आज वाराणसीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कारगिरिजादेवी यांच्या पार्थिवावर गुरुवारी वाराणसीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होतील व जिल्हा प्रशासनाने त्याची तयारी केली आहे. वास्तव्य कोलकात्यात असले, तरी अंतिम श्वास बाबा भोलेनाथच्या सान्निध्यात घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने कोलकात्याहून आणले जाईल व बाबतपूर विमानतळापासून त्यांची अंत्ययात्रा निघेल. या वेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गिरिजादेवी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून, शहरातील सांस्कृतिक संकुलाला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे.गिरिजादेवींची संगीत अकादमीची इच्छा रास्त होती. बनारसची सांगीतिक आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकादमी नक्कीच गरजेची आहे. गिरिजादेवी हे बनारसचे अनमोल रत्न होते. त्यांच्या हृदयात या शहराविषयी विशेष ममत्व होते.-पं. चन्नू लाल मिश्र,ख्यातनाम शास्त्रीय गायकआपाजी हा बनारसचा सूर होता. त्या केवळ वाराणसीच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भूषण होत्या. भगवान शंकराची काशी गिरिजेविना जणू सुनीसुनी झाली आहे.- प्रा. रेवती साकळकर, गिरिजादेवींच्या शिष्या व बनारस विद्यापीठातील संगीत अध्यापिका.
संगीत अकादमीचे गिरिजादेवींचे स्वप्न अपूर्ण, मोदींना भेटण्याची व्यक्त केली होती इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:25 AM