लतादीदींच्या नावे इंदूरमध्ये संगीत महाविद्यालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:56 AM2022-02-08T10:56:12+5:302022-02-08T10:56:58+5:30
लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर येथील शीख मोहल्ला परिसरातील घरात २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता.
अभिलाष खांडेकर
भोपाळ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ इंदूर येथे त्यांच्या नावे राष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय तसेच लतादीदींचा पुतळा उभारण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी केली. इंदूर येथे लता मंगेशकर यांच्या जन्म झाला होता. म्हणून या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.
लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर येथील शीख मोहल्ला परिसरातील घरात २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. लतादीदींचा जन्म इंदूर येथे झाला असल्याची माहिती त्यांच्या आई माई मंगेशकर यांनी पत्रकार सुरेश गावडे यांना लिहिलेल्या एका पत्रात दिली होती. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर की ग्वाल्हेरमध्ये झाला याबद्दल १९९०च्या दशकात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी माईंनी लिहिलेल्या या पत्राची प्रत ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.
प्रख्यात अभिनेते बाबा डिके यांचे बंधू व कलावंत अरुण डिके यांनी सांगितले की, लतादीदी यांचे वडील व प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटक मंडळीला प्रयोग करण्यासाठी होळकर महाराजांनी इंदूरला येण्याचे निमंत्रण दिले होते. दीनानाथ मंगेशकर यांचा इंदूरला महिनाभर मुक्काम होता. त्यावेळी माई मंगेशकर गर्भवती होत्या. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला.
वाढदिवशी देणार पुरस्कार
मध्य प्रदेशात दरवर्षी लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचा प्रघात यापुढेही सुरू राहील, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. हा पुरस्कार मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी १९८४-८५च्या सुमारास सुरू केला होता. तो काही वर्षे नित्यनेमाने देण्यात येत होता. पण सरकारी अनास्थेमुळे पुढे त्यात खंड पडला होता.