ऑनलाइन लोकमत
फैजाबाद, दि. १९ - उत्तरप्रदेशमधील फैजाबाद येथील 'रामलीला'मध्ये राम, हनुमानाची भूमिका साकारणा-या मुस्लिम तरुणांना स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. मांस खाणारे राम, हनुमान यासारख्या हिंदू देवतांची भूमिका साकारु शकत नाही असे स्थानिकांचे म्हणणे असून स्थानिकांच्या विरोधानंतर आता या भूमिकेसाठी हिंदू तरुणांची निवड केली जात आहे.
गेल्या ५० वर्षांपासून फैजाबादमध्ये नवरात्रीदरम्यान रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम म्हणजे हिंदू - मुस्लिम एकतेचा प्रतिक असून रामलीलामधील बहुसंख्य कलाकार हे मुस्लिम असतात तसेच रामलीला कमिटीमध्येही मुस्लिम सदस्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कार्यक्रमात मुस्लिम कलाकारांनी राम, हनुमानाची भूमिका साकारण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला याची कुणकुण लागलात रामलीला कमिटीने या भूमिकेसाठी मुस्लिम तरुणांना घेणे बंद केले. याविषयी कमिटीचे प्रमुख माजिद अली म्हणाले, मुस्लिम तरुण हे मांस खात असल्याने त्यांनी राम, हनुमानाची भूमिका साकारु नये अशी स्थानिकांची भूमिका होती. या विरोधाची कुणकुण लागताच आम्ही आता हिंदू तरुणांना प्रमुख भूमिका देतो व मुस्लिम तरुणांना अन्य छोटा भूमिका दिल्या जातात. स्थानिक हिंदू रामलीला दरम्यान 'देवतां'चे पाया पडत असल्याने त्यांचा विरोध होता असे कमिटीचे सदस्य बलधारी यादव यांनी सांगितले.
विरोधानंतरही हा रामलीला कार्यक्रम अजूनही उत्साहातच साजरा होतो. कार्यक्रमाचे आयोजकांपैकी एक नसीम हे टेलर आहेत. हा कार्यक्रम उत्साहात साजरा व्हावा आणि कार्यक्रमाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नसीम नवरात्रीदरम्यान जास्त काम करतात. हिंदू - मुस्लिमांमधील एकता अबाधित राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु असतात असे नसीम यांनी सांगितले.