बलवंत तक्षक -
चंडीगड : हरयाणातील नूह येथे हिंसाचार सुरू असतानाही मुस्लिम समाजाचे लोक सुरक्षेसाठी मंदिरांचा पहारा देत आहेत. नूह येथील बदकाली चौकात ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर एकाही मंदिराचे त्यांनी नुकसान होऊ दिलेले नाही. मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत.
नूहची गणना देशातील सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये केली जाते. येथील ८० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. नूह व्यतिरिक्त, फिरोजपूर झिरका, तावडू, पिंगवान, नगीना आणि पुनहाना या शहरांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक हिंदू लोकसंख्या आहे. अनेक गावांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत मुस्लिम लोकसंख्या आहे.
मरोडा गावचे सरपंच मुश्ताक खान म्हणतात की, ‘नूहमध्ये हिंसाचार झाला असला तरी मेवातमध्ये गंगा-जमुनी संस्कृती कायम आहे. ही संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी मुस्लिम लोक मंदिरांसमोर पहारा ठेवत आहे. हिंसाचारानंतर लाठ्या-काठ्या, रॉड आणि शस्त्रे घेऊन आलेल्या शेकडो दंगलखोरांपासून गुरूकुल, गोशाळा वाचविण्याचे काम मुस्लिम समाजातील लोकांनी केले.’ खान म्हणाले की, दंगलखोरांना धर्म नसतो. समाजात द्वेष निर्माण करणे हे त्यांचे काम आहे. पण आपल्याला गंगा-जमुनी संस्कृती जपायची आहे आणि त्यासाठी आपण कधीही मागे हटणार नाही.’
चारही बाजुने वेढा, मुले घाबरली होती अन्...- भादस गावातील गुरूकुलचे आचार्य तरुण महाराज म्हणाले की, ‘सरपंच शौकत अली यांनी हिंसाचाराच्या काळात हिंदू-मुस्लिम बंधूभावाचा आदर्श ठेवला. गुरूकुलला चारही बाजूंनी वेढा घातला होता, मुले घाबरली होती. पण शौकत अली यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. गोठ्यावर हल्ला करण्याचा डावही त्यांनी हाणून पाडला.- ’ गोशाळेचे संचालक वेदप्रकाश परमार्थी यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम बांधव हे त्यांचे सुख-दु:खात सोबती आहेत. हरयाणा हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत २०२ जणांना अटक करण्यात आली आहे.
हिंसाचारावेळी रजा, एसपींची बदली- हरयाणातील नूह जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) वरुण सिंगला जिल्ह्यातील हिंसाचारावेळी रजेवर होते, त्यामुळे त्यांची बदली भिवानी येथे त्याच पदावर करण्यात आली आहे.
आज काय घडले?- पानिपतमध्ये दुकानाची तोडफोड- मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त- गुरुग्राममध्ये तीन दुचाकी जाळल्या- अनेक परिसरात सलोखा-बंधुभाव