अमृतसर : शीख धर्मीयांच्या पवित्र सुवर्णमंदिरातील ‘गुरू रामदास लंगर’साठी अमृतसरमधील मालेरकोटला येथील मुस्लिम समुदायाने तब्बल ३३0 क्विंटल गहू दान केला आहे.‘शीख-मुस्लिम सांझा मंच’चे अध्यक्ष नासीर अख्तर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या एका मुस्लिम शिष्टमंडळाने हा गहू गुरुद्वारा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला. त्यानंतर या शिष्टमंडळाने लंगरमध्ये सहभागही नोंदवला.सुवर्णमंदिराचे मुख्य व्यवस्थापक मुख्तियार सिंग आणि अतिरिक्त व्यवस्थापक राजिंदरसिंग रुबी यांनी मुस्लिम शिष्टमंडळास पारंपरिक ‘सिरोपा’ देऊन सन्मानित केले.अख्तर यांनी सांगितले की, ‘शीख आणि मुस्लिम यांच्यात गुरूंच्या काळापासून सौहार्द आहे. त्यात वाढ करण्याची नितांत गरज आहे. याठिकाणी धर्म, पंथ, जात, रंग आणि इतर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न पाळता सर्वांना मोफत जेवण दिले जाते. ही गुरू दरबाराची महानता आहे.’अख्तर यांच्यासोबत अन्वर खान, शाबीर खान, मोहंमद अरफान, मोहंमद लियाकत, सादिक अली आणि मोहंमद हनिफ यांची उपस्थिती होती.शिष्टमंडळातील एक सदस्य मोहंमद परवेज यांनी सांगितले की, ‘काही कुटुंबांनी दानात दिलेल्या १.५0 लाख रुपयांतून हे धान्य आम्ही खरेदी केले.दुबईस्थित दानशूर व्यावसायिक सुरिंदरपालसिंग ओबेरॉय आणि तख्त पाटणासाहिबचे जथेदार रणजितसिंग यांनी गव्हाच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवली. आमच्या वसाहतीतील नागरिकांच्या मदतीने आणखी गहू लंगरसाठी पाठविण्याचा आमची योजना आहे.’सूत्रांनी सांगितले की, सामाजिक सलोखा टिकून राहील, हे अशा घटनांतून सिद्ध होते. सर्वांत आधी इतरांचा विचार करणारे लोक आणि संस्था या देशात आहेत, हे दाखवून देणारी ही घटना आहे.
मुस्लिम समुदायाने दिला ‘गुरू रामदास लंगर’साठी ३३0 क्विंटल गहू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:35 PM