आझमगड- काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष मुस्लीमांचा आहे असे वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी यांनी असे वाक्य उच्चारल्याचे वृत्त इन्किलाब या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे असे काल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आणि राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही केली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे.आझमगड येथील भाषणामध्ये पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले, 'काँग्रेस हा मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम स्त्रियांचाही आहे? ' इतकेच नव्हे तर पंतप्रधानांनी राहुल गांधीसह काँग्रेसच्या नेत्यांनी तिहेरी तलाकचे परिणाम भोगणाऱ्या महिलांना भेटावे आणि मगच त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यावे असा सल्लाही दिला. हे विधेयक विरोधकांनी अडवल्यामुळे मुस्लीम महिलांच्या प्रश्नांमध्ये वाढ झाली आहे अशी टीका त्यांनी केली. 340 किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस रस्त्याचे भूमिपूजन केल्यावर ते बोलत होते.
'काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम महिलांचाही आहे?'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:31 PM