गोंडा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे प्रभावित झालेल्या मुस्लिम कुटुंबीयांनी 23 मे रोजी त्यांच्या घरात जन्मलेल्या नवजात मुलाचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवलं आहे. त्याचसोबत त्यांची मुलाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी पंचायत कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाकडे याबाबत अर्ज केला आहे.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवाशी मोहम्मद इदरीश आणि मैनाज बेगम या मुस्लिम दामप्त्याच्या घरी मुलगा जन्माला आला. 23 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल होते. संपूर्ण देशात नरेंद्र मोदी नावाच्या लाटेने विरोधकांना सुपडा साफ केला होता. अशातच निकालाच्या दिवशी या मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी जन्माला आला. तेव्हा या मुलाचं नावं नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवायचं असं मैनाज बेगम यांनी हट्ट केला. पहिल्यांदा मैनाज बेगम यांना कुटुंबाकडून समजविण्याचा खूप प्रयत्न केला गेला. मात्र मैनाज आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यामुळे दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या मोहम्मद इदरीश यांनी मैनाज बेगम यांचा हट्ट पुरवत मुलाचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्यास मान्य केलं.
नातेवाईकांच्या सांगण्यानुसार खूप वेळा मैनाज बेगम यांना समजवल्यानंतरही त्यांनी हट्ट सोडला नाही म्हणून त्याला परवानगी द्यावी लागली. मुलाच्या नावाची नोंदणी व्हावी यासाठी कायदेशीररित्या अर्ज केला आहे.