लखनौ - शहाजहाँपूर शहरातील एका मुस्लीम युवकाने घरवापसी करत पुन्हा हिंदू धर्म स्विकारला. येथील राम-जानकी मंदिरात गंगास्नान करुन विधिवत पूजा-अर्चा केल्यानंतर हनुमान चालिसा पठणही केले. राष्ट्रीय गोरक्षक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या युवकास श्रीराम नामाचा गमछा आणि गळ्यात हार घालून त्याचं स्वागत केलं. आपण स्वेच्छेनं हे धर्मांतर केल्याचं युवकाने सांगितलं.
खिरनीबाग येथील राम-जानकी मंदिरात राष्ट्रीय गोरक्षक संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी पद्मनाभ महाराजाच्या सानिध्यात मुस्लीम युवक गुलनाज उर्फ सोनूने सनातन धर्म स्विकारला. घरवापसी केल्यानंतर आता तो नावाने विराट झाला आहे. यावेळी बोलताना युवक म्हणाला की, आमचे पूर्वज सनातनी होते, त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर चांगले आणि वाईट समजू लागले. त्यातूनच, पुन्हा हिंदू धर्म स्विकारण्याचं ठरवलं. कुटुंबात आई, बहिण आणि भाऊही आहे. मात्र, आपल्या निर्णयाचा कुणालाही पश्चाताप नाही. आता, आपल्या मूळ धर्मात येऊन मला अभिमान वाटतो, असेही गुलनाजने म्हटले.
स्वामी पद्मानाभ यांनी यावेळी बोलताना म्हटले की, घरवापसीचं हे शुभकार्य बदलतानाचे हे भारताचे चित्र आहे. जे लोक बळजबरीने दुसऱ्या समुदायात गेले आहेत, ते आता पुन्हा घरवापसी करत आपल्या पूर्वजांनी केलेली चूक सुधारत आहेत. विहिपचे जिल्हा मंत्री राजेश अवस्थी यांनी म्हटलं की, सनातन धर्म सर्वात मोठा धर्म आहे. जे लोक इस्लाम धर्मात गेले होते, त्यांची घरवापसी करण्याचं काम विश्व हिंदू परिषद करत आहेत. त्यासाठी, ते तत्पर आहेत. शहाजहाँपूर येथून घरवापसीच्या अभियानाला सुरुवात झाली असून हे अभियान देशभर राबविण्यात येईल, असेही अवस्थी यांनी म्हटले.