ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २१ - गाईंची कत्तल केल्याच्या वा बीफ शिजवून खाल्याच्या संशयावरून एकीकडे मुस्लिमांना लक्ष्य केले जात असताना, दादरीची हिंसक घटना ज्या उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याच उत्तर प्रदेशमध्ये एका मुस्लिम व्यक्तीने १४ गाईंच्या प्रेमापोटी आपल्या पत्नीचा त्याग केल्याची घटना समोर आली आहे.
इटाह जिल्ह्यात राहणारे अफाक अली उर्फ मुन्ना यांच्या आयुष्यात ही घटना १३ वर्षांपूर्वी घडली असली तरी सध्या बीफच्या मुद्यावरून सुरू असलेल्य रणकंदनाच्या मुद्याच्या पार्श्वभूमीवर हे उदाहरण लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरू शकते.
वयाची पन्नाशी पार केलेले अफाक १५ व्या वर्षापासून गाई खरेदी करत असून आता त्यांच्याकडे १४ गाई आहेत. २००१ साली त्यांचे अफरोज जहानशी लग्न झाले. मात्र त्यांचे हे गाईंवरील निरातिशय प्रेम त्यांच्या पत्नीला सहन झाले नाही आणि तिने अफाकना त्यांच्या गाई किंवा आपण यापैकी कोणा एकाचीच निवड करण्यास सांगितले. मात्र अफाक यांनी आपल्या गाईंना उघड्यावर न टाकण्याचा निर्णय घेतल्याने अफरोज तत्काळ घर सोडून निघून गेली. गावातील पंचायत सदस्यांनी त्यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला मात्र अफाक यांचे गाईंवर अतिशय प्रेम असल्याने तो असफल ठरला.
' मी कोण्या दुस-या स्त्रीमुळे नव्हे तर गाईंमुळे पत्नीपासून दुरावलो' असे सांगणा-या अफाक यांच्या चेह-यावर कोणताही खेद नव्हता तर एक स्मित होते, यावरूनच त्यांचे त्यांच्या गाईंवर किती प्रेम आहे, याची कल्पना येते. ' माझ्या या निर्णयाचे गावकरी कौतुक करतात पण माझ्या नातेवाईकांना मात्र हा निर्णय पटलेला नाही, ते मल टोमणे मारत असतात. या गाईंवरून माझी पत्नी माझ्याशी रोज भांडायची, मी त्यांना विकून टाकावे असा तिचा आग्रह होता. पण माझ्या अंतर्मनाने मला तसे करण्याची परवानगी दिली नाही. मला माझ्या (पत्नीपासून फारकत घेण्याच्या)निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही, मी शांतपणे जीवन जगत आहे' असे अफाक यांनी नमूद केले.
अफाक आपल्या १४ गाईंची पाळीव प्राणी म्हणून नव्हे तर पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. त्यांना खाण्यासाठी चांगला चारा उपलब्ध करून देणे, त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेणे, वेळच्यावेळी पशुवैद्यांकडे नेणे या सर्व गोष्टी ते निगुतीने करतात.