उत्तर प्रदेशच्या कानपूर इथं ४५ वर्षीय युवकाला भररस्त्यात बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकचं नाही तर त्याच्या घरातही गोंधळ घातला. मारहाण केल्यानंतर युवकाला पोलिसांच्या हाती सोपवलं. या घटनेचा व्हिडीओ बनवून काहींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात पीडित युवकाची छोटी मुलगी वडिलांना सोडण्यासाठी दयेची याचना करताना दिसतं.
कानपूर डीसीपी रवीना त्यागी म्हणाल्या की, एका व्हायरल व्हिडीओमध्ये कलबर्रा येथे रामगोपाल चौकात एका मुस्लीम युवकाला काही लोक मारताना दिसत होते. व्हिडीओच्या आधारे अज्ञात लोकांवर तक्रार दाखल केली आहे. संबंधित घटनेची नोंद करण्यात आली आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
कानपूरमध्ये काही लोक एका मुस्लीम रिक्षाचालकाला मारत त्याच्याकडून ‘जय श्री राम’ची घोषणा द्यायला लावली. रस्त्यावरुन त्याची मारत मारत धिंड काढली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राजेश बँडवाला, अमर गुप्ता आणि राहुल कुमार याला अटक केली आहे. बाकीच्या धरपकड सुरू आहे. कानपूरच्या एका वस्तीत कुरैशा आणि राणी नावाच्या कुटुंबामध्ये बाईकवरुन भांडण झालं. कुरैशाने राणीला मारहाण करत तक्रार नोंदवली. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तिथे जाऊन आंदोलन केले. मारहाण झालेल्या अफसार अहमदवर कुठलाच आरोप नसताना त्याला मारहाण केली.
कुरैशा बेगमच्या घरी तिच्या मुलांना पकडण्यासाठी गेले असता तिथे कुणीच हाती लागलं नाही त्यानंतर रस्त्यावर कुरैशाचा दिर सापडला तर त्याला बेदम मारलं. या प्रकरणी बजरंग दलाचे संयोजक दिलीप सिंह बजरंगी म्हणाले की, आम्ही आमच्या सनातन धर्माला वाचवण्यासाठी सक्षम आहोत. जर कुणी हिंदू कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यापुढे ढाल बनून उभं राहू. पोलिसांनी सध्या दोन्ही बाजूच्या FIR नोंदवून तपास सुरू केला आहे. कुरैशाचं म्हणणं आहे की, राणीच्या दरवाजावर बाईक उभी करण्यावरुन सुरु झालेल्या वादाला धार्मिक रंग दिला गेला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येऊन अफसारचा जीव वाचवला.