उत्तराखंड- धर्माच्या मुद्द्यावरुन समाजात राजकारण सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना माणुसकीचं दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. हिंदू तरुणाला रक्त देण्यासाठी मुस्लीम तरूणाने रोजा तोडून रक्तदान केल्याची घटना घडली आहे.
उत्तराखंडमधील एका व्यक्तीच्या या पावलाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. 20 वर्षीय अजय बिलावलम या तरूणाला कुष्टरोगाचं निदान झालं. त्याच्या रक्तातील पेशींचं प्रमाण घटायला सुरुवात झाली. रक्तातील पेशींचं प्रमाण झपाट्याने घटायला लागल्याने अजयच्या जीवाला धोका निर्माण झाला. तेव्हा अजयची मदत करण्यासाठी एक मुस्लीम व्यक्ती धावून आला. अजयला A+ या रक्तगटाची गरज होती. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या वडिलांनी सोशल मीडियाचा आधार घेत मित्र आणि ओळखीच्यांकडून रक्ताची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी इतरांना रक्तदानाचं आवाहन केलं.अजयच्या वडिलांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोस्ट वाचून आरिफ खान या तरुणाने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. नॅशनल असोसिएशन ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट्स राइट्सच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आरिफने अजयच्या वडिलांना फोन करून रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली.
आरिफ रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर रक्तदान करण्याआधी डॉक्टरांनी त्याला काहीतरी खाण्याचा सल्ला दिला. पण, पवित्र रमजान महिना सुरु असल्यामुळे आरिफने रोजा ठेवला होता. त्यामुळे काही न खाता रक्तदान केलं तर चालेल का, अशी विचारणा त्याने केली. डॉक्टरांनी असं करण्यास नकार दिला. पण, आपल्या उपवासापुढे एखाद्याचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, कारण ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ आहे, याच विचाराने आरिफने त्याचा रोजा सोडला आणि रक्तदान केलं.
रोजा सोडून अजयच्या मदतीसाठी पुढे गेलेल्या आरिफचं सगळीकडून कौतुक होतं आहे. अजयचं आयुष्य किती वाढेल हे ठावूक नसलं तरी कुष्ठरोगाशी लढण्यासाठी काहीशी जास्त वेळ आरिफच्या रक्ताने त्याला मिळाली आहे.