Assam CM Attack On Congress:आसाममधील भाजप सरकारने राज्यात मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. आता यावरुन राज्यातील राजकारण तापायला सुरू झाले असून, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत लहान मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे बिस्वा सरमा म्हणाले.
विधानसभेच्या अधिवेशनाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 'काँग्रेसवाल्या लोकांनी ऐकावे, मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत राज्यात बालविवाह होऊ देणार नाही. तुम्ही मुस्लिम समाजाच्या मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी उघडलेले दुकान आम्ही पूर्णपणे बंद करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हिमंता बिस्वा सरमा यांचा ठरावमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 2026 पर्यंत राज्यातील बालविवाह पूर्णपणे बंद करण्याचे ठरवले आहे. सभागृहात विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, मी तुम्हा लोकांना राजकीय आव्हान देतो की, मी तुमचे हे दुकान 2026 पर्यंत बंद करेन. आसाममधून बालविवाह पूर्णपणे संपुष्टात येईल. बालविवाह संपवण्यासाठी राज्यव्यापी मिशन सुरू केले जाईल, ज्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होतील. काही लोक म्हणतात की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत, परंतु तिहेरी तलाक, बालविवाह आणि बहुपत्नीत्व संपवण्यासाठी आम्ही काँग्रेसपेक्षा जास्त काम केले आहे.
AIUDF चा विरोधएआययूडीएफसह सर्व मुस्लिम संघटनांनी आसाम सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. एआययूडीएफचे आमदार अश्रफुल हुसैन म्हणाले की, भाजप सरकार मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी हे करत आहे. मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935 रद्द करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला होता, परंतु सभापतींनी आम्हाला परवानगी दिली नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमचा स्पीकर बंद केला. हे कायदे काढून या लोकांना मुस्लिमांचे हक्क संपवायचे आहेत. असेच चालू राहिल्यास आसाममध्ये हुकूमशाही लागू होईल, अशी टीका त्यांनी केली.