Badruddin Ajmal Controversy, Hindu-Muslim: AIUDF सुप्रीमो आणि आसाममधील लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी हिंदू समुदायावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मी केलेल्या विधानावरून जो वाद झाला त्याची मला लाज वाटते आणि मी त्यासाठी दिलगीर असल्याचे त्यांनी सांगितले. अजमल यांच्या वक्तव्यावरून राज्याच्या अनेक भागांत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. तथापि, त्यांनी सांगितले की त्यांनी केलेले विधान हे चुकीच्या पद्धतीने घेतले गेले असून त्यांनी कोणत्याही एका समुदायाला लक्ष्य केलेले नव्हते.
AIUDF प्रमुख म्हणाले, “मी कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य केले नाही किंवा हिंदू शब्द वापरला नाही. कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पण तो एक मुद्दा बनला आणि त्याबद्दल मी दिलगीर आहे. मला लाज वाटते की माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या बाबतीत असे घडले." अजमल यांनी शनिवारी दावा केला होता की, आपल्या विधानांचा व वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला आहे.
त्याचवेळी या मुद्द्यावरून त्यांच्यावरील पोलीस केसेसवर ते म्हणाले, "पोलीस केसेस राजकारण्यांचा आलेख वरच्या दिशेने जात असल्याचे दाखवतात. अनेक हिंदू नेते मुस्लिमांविरोधात रोज बोलतात, पण आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. सर्वांसाठी समान विकास आणि अधिकार हा माझ्या विधानाचा हेतु आणि अर्थ होता. पण माझ्या विझानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्याला वेगळं वळण देण्यात आले," असे ते म्हणाले.
बदरुद्दीन अजमल यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा गुजरात विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडला. गुजरातमध्ये सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला वाचवण्यासाठी अजमल असे वागले असा आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेस (TMC) ने गुवाहाटी येथे AIUDF प्रमुखांच्या पुतळ्याचे दहन केले आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपशी संगनमत केल्याचा आरोप केला. मात्र, भाजपने बदरुद्दीन अजमल यांच्या वक्तव्यापासून दूर राहिल्याचे दिसून आले.
अजमल नक्की काय म्हणाले होते?
बद्रुद्दीन अजमल यांनी शुक्रवारी एका मुलाखतीत महिला, हिंदू पुरुष आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यावर भाष्य केले होते. एक वादग्रस्त विधान देताना अजमल म्हणाले होते, “हिंदूंनी मुलांच्या बाबतीत मुस्लीम सूत्र स्वीकारले पाहिजे आणि मुलांची लहान वयातच लग्ने करून दिली पाहिजेत. मुस्लिम तरुण वयाच्या २०-२२व्या वर्षी विवाह करतात आणि मुस्लिम महिला वयाच्या १८व्या वर्षी विवाह करतात, जे घटनात्मक आहे. हिंदू लग्नापूर्वी एक, दोन किंवा तीन अवैध बायका करतात आणि मुलांना जन्म देत नाहीत, स्वतःचा आनंद उपभोगतात आणि पैसे वाचवतात." यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.