लखनऊ, दि. 2 - देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली जात असून मुस्लिम राष्ट्रीय वेगळ्या प्रकारे ईद साजरी केली आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचने केक कापून बकरी ईद साजरी केली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळी प्रथेला विरोध करत बकरी ईदच्या दिवशी जनावरं नाही तर केक कापा, असे आवाहन मुस्लिमांना केले होते. त्यानुसार त्यांनी केक कापून ईद साजरी केली.
मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केलेल्या आवाहनाला मुस्लिम उलेमाने विरोध केला होता. 1400 वर्षांपासून बकरी ईदला जनावरांचा बळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय, धर्मामध्ये आरएसएस हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
जनावरांचा बळी देण्याऐवजी बक-याच्या आकाराचा केक कापा, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी मुस्लिम नागरिकांना करत होते. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक राजा रईस यांनी सांगितले होते की, बळी देणं इस्लाममध्ये गरजेचं नाही. पशू-पक्षी, झाडेझुडपे सर्व काही अल्लाहच्या दयेनं आहेत. बक-याच्या आकाराचा केक कापूनही बकरी ईद साजरी केली जाऊ शकते. तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली म्हणाले होते की, ' बळी देण्याबाबत कुराणमध्ये सांगण्यात आले आहे. जनावरांचा बळी मंदिरामध्येही दिला जातो. त्यामुळे हा सल्ला केवळ मुस्लिमांनाच का दिला जात आहे?'.
यावर मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक राजा रईस यांनी सांगितले होते की, कुराणमध्ये असे लिहिलंय आहे की, जनावरांचे मांस तसंच रक्त खुदाकडे जाणार नाही. त्यामुळे खुदा बळी देण्याच्या विरोधात असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. रईस यांच्या विधानाचा विरोध करत मौलाना खालिद रशीद यांनी केला होता. 'आता ते म्हणतायेत कुराणमध्ये बकरी ईदला बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या म्हणतील कुराणमध्ये इस्लाम धर्माचा उल्लेखच नाही. कमीत कमी सणांच्या दिवशी तर शांतता राखा. तसंच सणाच्या दिवशी वाद निर्माण करणं कोणत्या तरी अजेंड्याचा भाग असू शकतो, असे सांगत मौलाना खालिद रशीद यांनी टीका केली होती.