लखनौ : तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून पत्नीला घटस्फोट देणाºया मुस्लीम समाजातील प्रथेविरुद्ध कायदा करण्याची संपूर्ण तयारी केंद्र सरकारने केली असतानाच, आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने निकाहनाम्यात दुरुस्ती करणार असल्याचे जाहीर केले आहे. विवाहाच्या वेळीच वराकडून ‘तिहेरी तलाक’ देणार नसल्याचे वचन निकाहनाम्यात लेखी घेण्यात येईल, असे बोर्डाने म्हटले आहे.तिहेरी तलाकची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आॅगस्टमध्येच बेकायदा ठरविली. सरकारनेही तिहेरी तलाक देणे फौजदारी गुन्हा ठरविणारा कायदा करण्याची तयारी केली आहे. संसदेच्या या अधिवेशनात हा कायदा संमत होण्याची शक्यता आहे. त्याआधीच पर्सनल बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उर रेहमान सज्जाद नोमानी यांनी सांगितले की, आम्ही निकाहनाम्यात तिहेरी तलाकविरोधी तरतूद करीत आहोत. निकाहनाम्यातील एका स्तंभात ‘मी पत्नीला तिहेरी तलाक देणार नाही’, असे लिहिलेले असेल. त्यावर वराने होयची खूण केल्यास त्याला पत्नीला तिहेरी तलाक देता येणार नाही.ते म्हणाले की, बोर्डाच्या ९ फेब्रुवारी रोजी होणाºया बैठकीत या सुधारणेवर विचार केला जाईल. केंद्राच्या कायद्यास पर्सनल लॉ बोर्डाने विरोध केला आहे. आम्ही तिहेरी तलाकच्या विरोधात आहोत. मात्र कायद्याला आमचा विरोध आहे, कारण हा कायदा मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करणारा आहे. (वृत्तसंस्था)सरकार करणार चर्चा‘ट्रिपल तलाक’वर संसदेच्या बाहेरही सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा करण्याचा निर्णय भाजपाने केला आहे. मित्रपक्षांबरोबरच विरोधकांशीही सरकार व पक्षपातळीवर चर्चा केली जाणार आहे. पक्षांसोबत विरोधी पक्षांच्या संसद सदस्यांसोबतही चर्चा करण्यात येणार आहे. सुषमा स्वराज यांच्या घरी याबाबत एक बैठक झाली. तिथे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री उपस्थित होते. राज्यसभेत एनडीएकडे बहुमत नसल्याने भाजपाची अडचण झाली आहे. त्यामुळेच हा प्रयत्न सुरू आहे.
‘ट्रिपल तलाक’विरोधात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच सज्ज, विवाहाच्या वराकडून लिहून घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:47 AM