Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. यानंतर मध्यरात्री व्यास तळघराचे शुद्धीकरण करून पूजा करण्यात आली तसेच आरतीच्या वेळाही ठरवण्यात आल्या. यानंतर मुस्लिम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. या निकालावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सैफुल्लाह रहमानी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, न्यायालयावरील विश्वास अत्यंत कमी झाल्याचे म्हटले आहे.
देशातील न्यायालये अशा पद्धतीने काम करत आहे, ज्यामुळे देशवासीयांचा न्यायालयांवरील विश्वास कमी होत चालला आहे. जो प्रकार झाला, तो अतिशय निराशाजनक होता. तिथे मशिद आहे. या निर्णयामुळे २० कोटी मुस्लिम बांधव आणि सर्व न्यायप्रेमी नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. मुस्लिम समाजाची अवस्था दयनीय झाली आहे, असे सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटले आहे.
...तर देशात इतकी मंदिरे अस्तित्वात असती का?
ऐतिहासिक तारखांचे सत्य समजून घेतले पाहिजे. इंग्रजांनी या देशात येऊन फोडा आणि राज्य करा, हे धोरण स्वीकारले. १८५७ मध्ये त्यांनी पाहिले की, देवाचे उपासक आणि पूजक दोघेही देशासाठी एकत्र आले आहेत. यानंतर, त्यांनी दोन समुदायांमध्ये फूट निर्माण करण्याचे काम केले. अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे बळजबरीने ताब्यात घेण्याची वृत्ती मुस्लीम समाजाची असती तर देशात इतकी मंदिरे अस्तित्वात असती का? अशी विचारणा रहमानी यांनी केली.
दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली नाही
ज्या तडकाफडकीने न्यायालयाने निर्णय घेऊन पूजेला परवानगी दिली, त्यामुळे दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. न्याय देणाऱ्या न्यायालयांवरचा विश्वास कमी झाला आहे. बाबरी मशिदीच्या निर्णयात न्यायालयाने मशिदीखाली मंदिर नसल्याचे मान्य केले होते पण एका समुदायाची श्रद्धा लक्षात घेऊन त्याच्या बाजूने निर्णय दिला होता, असा मोठा आरोप रहमानी यांनी केला. तसेच मंदिर पाडून मशीद बांधली असे ज्ञानवापी आणि अन्य काही मशिदींबाबत म्हटले जाते, ते चुकीचे आहे. इस्लाममध्ये हिसकावलेल्या जमिनीवर मशीद बांधता येत नाही. तिथे बांधलेली पहिली मशीदही विकत घेण्यात आली, असा मोठा दावा रहमानी यांनी केला.
दरम्यान, ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय दिवसातून पाच वेळा आरतीही करण्यात येणार आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पहिली पूजा केली.