चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) निषेधार्थ तामिळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक ठिकाणी हजारो मुस्लिमांनी बुधवारी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. तामिळनाडूतील मुस्लिम संस्थांतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या निदर्शनांमध्ये द्रमुक व अन्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. चेन्नईतील चेपॉक येथे मुस्लिमांची निदर्शने सुरू असताना, त्याचवेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मुस्लिमांसाठी कल्याणकारी योजनांची विधानसभेत घोषणा केली. त्यानुसार उलेमांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी असलेले १५०० रुपये पेन्शन आता तीन हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच नवीन हाज इमारत बांधण्यासाठी तामिळनाडू सरकार १५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बुधवारी मोर्चा काढू नये असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मुस्लिम संघटनांना दिला होता. तामिळनाडूतील मदुराई, तंजावूर, कुड्डलोर, कोईम्बतूर, तिरूपूर, तिरूनेवेल आदी ठिकाणीही मुस्लिम बांधवांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने केली. हजारो मुस्लिम निदर्शक चेपॉक येथे जमा झाले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध करणारे फलक मोर्चेकऱ्यांनी हाती धरले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात तामिळनाडू विधानसभेने ठराव मंजूर करावा अशीही त्यांची मागणी होती. या मोर्चात मुस्लिम महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तामिळनाडू विधानसभा, राज्य सचिवालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे मुस्लिम आंदोलकांनी अखेर चेपॉक येथेच निदर्शने केली. कर्नाटकात कवी व पत्रकाराला अटकच्कर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील कविता गायल्याबद्दल एक पत्रकार व कवी अशा दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. सिराज बिसारल्ली या कवीने गंगावती शहरामध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या अनेगुंडी उत्सवात ही कविता म्हटली होती व त्याची ध्वनिचित्रफित राजाबक्षी या पत्रकाराने समाजमाध्यमांवर झळकवली होती.