अयोध्या – सध्या सगळीकडे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची चर्चा आहे, अनेक वर्षाच्या वादविवादानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत असल्याने रामभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या रामभक्तांमध्ये फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लीम भक्तही सहभागी आहेत. अयोध्येमधील जमिनीचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता, मात्र अलीकडेच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने योगदान देत आहेत, यात छत्तीसगडमधील फैज खान यांनी मंदिरासाठी वीट पाठवत आहेत. तर अन्य काही जण भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एका इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाने काही मुस्लीम भक्तांशी संवाद साधला, यात राजा रईस, वासी हैदर, हाजी सईद, जमशेद खान आणि आजम खान यांचा समावेश आहे.
हे सर्व मुस्लीम भक्त रामाला इमाम-ए-हिंद आणि अनेक राजपूतांचे पूर्वज मानतात. ज्यांनी पुढे जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला. फैजाबाद येथील रहिवाशी जमशेद खान यांनी सांगितले की, आम्ही इस्माल धर्म स्वीकारला, इस्लामनुसार प्रार्थना करतो पण धर्म परिवर्तन केल्यानं आमचे पूर्वज बदलत नाहीत. प्रभू राम आमचे पूर्वज होते आणि आम्ही आमच्या हिंदू बांधवांसोबत हा उत्सव साजरा करणार आहोत.
तर सईद अहमद मक्का हजवरुन परतले आहे. ते कट्टर मुस्लीम आहेत पण त्याचसोबत रामभक्तही आहेत. ते सांगतात की, आम्ही भारतीय मुस्लीम प्रभू रामाला इमाम-ए-हिंद मानतो, मी अयोध्येतील राम मंदिर निर्माणावेळी उपस्थित राहणार आहे. तसेच मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे डॉ. अनिल सिंह यांनी सांगितले की, फैज खान छत्तीसगडवरुन राम मंदिराच्या निर्माणासाठी काही विटा पाठवणार आहेत. त्याचसोबत देशभरातील अनेक मुस्लीम कारसेवक अयोध्येत येऊन सोहळा साजरा करतील.
दरम्यान, जर आम्हाला गाभाऱ्यात जाण्याची संधी मिळाली ज्याठिकाणी मंदिराची पायाभरणी करणार आहेत, तर ते आमच्यासाठी आशीर्वादासारखं असेल. जर सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला प्रवेश नाकारला तर आम्ही बाहेर उभं राहून या कार्यक्रमात सहभागी होऊ असं फैजाबाद येथील रशिद अंसारी यांनी सांगितले. तर अलीकडेच अयोध्येत जाऊन दर्शन घेणारे मुस्लीम नेते आजम खान यांनी मला भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यास शरयू नदीत जलसमाधी घेईन असा इशारा दिला आहे.