- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर आरोप केला होता की, एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून ते मुस्लिमांना देणार आहेत. आता संपूर्ण निवडणूक या मुद्यावर येताना दिसत आहे.
भाजप चौथ्या टप्प्यात मुस्लीम आरक्षणाला मुख्य मुद्दा बनवण्याची तयारी करत आहे. हा मुद्दा समोर आल्याने भाजपमध्ये जोरदार उत्साह आहे. मनातील इच्छा पूर्ण झाल्याची भावना त्यांच्यात आहे. कर्नाटकात काँग्रेसने मुस्लिमांना मागासवर्गीय ठरवून आरक्षण दिले आहे. तर, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनीही थेट मुस्लिमांना आरक्षण देण्याचे विधान करून विरोधी पक्षांच्या अडचणीत वाढ केली आहे.
काँग्रेसची अडचण एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी जातनिहाय जनगणना करून एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देण्याची भाषा करत आहेत. तर, कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष विचित्र परिस्थितीत अडकला आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याचे समर्थनही करू शकत नाही आणि विरोधही करू शकत नाहीत.
भाजपला मिळाला आरक्षण आणि तुष्टीकरणाचा मुद्दाभाजपला मुस्लीम आरक्षणाचा आणि तुष्टीकरणाचा मुद्दा मिळाला आहे. मोदी त्यांच्या सर्व निवडणूक सभांमध्ये आरोप करत आहेत की, ‘इंडिया’ आघाडीला एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना द्यायचे आहे. मी आहे, तोपर्यंत या देशात धर्माच्या नावावर आरक्षण दिले जाणार नाही, असे ते सांगत आहेत. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या राष्ट्रीय सरचिटणीसांसोबत बैठक घेऊन सर्व दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय नेत्यांसाठी निवडणूक कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना दिल्या.