मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भाजपाची टोपी घालण्यास नकार दिल्याने एका मुस्लिम विद्यार्थिनीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील दोन तरुणांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने या दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले आहे.
विद्यार्थिनीने आपल्या सोबत घडलेला प्रकाराची ट्वीटरवरून माहिती दिली आहे. '2 एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या सहलीसाठी मी आग्रा या ठिकाणी गेले होते. या सहलीला आलेल्या 55 विद्यार्थ्यांमध्ये मी एकमेव मुस्लिम विद्यार्थीनी होते. सोबत चार फॅकल्टी मेंबरही होते. त्यामध्ये दोन पुरुषांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी दारू प्यायल्यानंतर मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोबत काही सामान आणलं होतं. त्यामध्ये भाजपाची टोपीही होती. टोपी घालण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी त्यासाठी नकार दिल्याने त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. दोन फॅकल्टी मेंबरच्या समोरच हा प्रकार सुरू होता. पण त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं' असं या विद्यार्थिनीने म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महाविद्यालय प्रशासनाने याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले आहे. महाविद्यालयाचे संचालक एस. एम. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी चार वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी या घटनेची माहिती दिली नाही. मात्र या विद्यार्थिनीने तक्रार देताच आम्ही दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले आहे. आता हे प्रकरण महाविद्यालयातील अंतर्गत चौकशी समितीकडे दिले असून त्याचा तपास सुरू आहे.' तसेच विद्यार्थिनीने 'मी ट्वीटर जे लिहिलं आहे त्यावर ठाम आहे. पण सध्या हे प्रकरण चौकशी समितीकडे असल्याने त्यावर मी अधिक काहीही बोलणार नाही. या प्रकरणाचा योग्य तपास होईल असं मला वाटतं. माझ्याबाबतीत जे घडलं त्याविरोधात मी लढत आहे,' असं म्हटलं आहे. विद्यार्थिनीचं हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने नेटिझन्स त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.