ऑनलाइन लोकमत
मंगलोर, दि. १२ - वरचेवर असहिष्णू घटनांसाठी कुप्रसिद्ध झालेल्या मंगलोरमध्ये एका मुस्लीम विद्यार्थिनीने रामायणाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत सहिष्णूतेचे दर्शन घडवले आहे. भारत संस्कृती प्रतिष्ठानने दोन महिन्यांपूर्वी रामायणावर परीक्षा घेतली होती. यामध्ये नववीत शिकणा-या फातिमाने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कर्नाटक केरळ सीमेवरील सुलीयापाडाऊ गावातल्या सर्वोदय हायस्कूलमध्ये ती शिकते. रामायण आणि महाभारताचा अभ्यास करण्याची तिची खूप इच्छा होती आणि यासाटी तिच्या काकांनी तिला मदत केल्याचे फातमिचे वडील इब्राहिम यांनी सांगितले. आता फातिमाला महाभारतावर आधारीत परीक्षेतही भाग घ्यायची इच्छा आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून हिंदू साहित्यामध्ये रस असलेल्या फातिमाने या विषयांचा अभ्यास केल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. पी सत्यशंकर भट या परीक्षेचे समन्वयक होते. या परीक्षांसाठी कुणालाही सक्ती करण्यात आली नाही, तसेच अभ्यास ज्याचा त्यानेच करायचा होता असे भट यांनी सांगितले आहे.