ऑनलाइन लोकमत
अलिगढ, दि. 13 - पती आणि सासरच्या मंडळींनी घरात घेण्यास नकार दिल्यानंतर एका मुस्लिम महिलेने हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिली आहे. मंगळवारपासून ती घराच्या बाहेर बसून आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये ही घटना घडली आहे. मुस्लिम समाजातील तीन तलाकच्या मुद्द्यावरून देशभरात बराच गदारोळ सुरू असताना या घटनेमुळे येथील परिसरात तणावाचे वातावरण आहे. मात्र, हा तीन तलाकचा मुद्दा नसल्याचं महिलेने स्पष्ट केलं आहे.
येथील बुलंदशहरच्या रिहाना ( वय-30) हिचा विवाह 2012 मध्ये जमालपुरच्या मोहम्मद शरीफ सोबत झाला होता. काही महिन्यापूर्वी तिचं आणि पतीचं काही कारणास्ताव भांडण झाल्याने दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर तिला मारहाणही झाली. त्यामुळे रिहाना आपल्या 4 वर्षाच्या मुलीला घेऊन आई-वडिलांच्या घरी निघून गेली. पण, मंगळवारी जेव्हा ती आपल्या सासरी परतली तेव्हा सासरच्यांनी तिला घरातच घेतलं नाही, तुझ्यासाठी आता या घरात जागा नाही असं तिला सांगण्यात आलं. त्यावर मला घरात घेतलं नाही तर मी हिंदू धर्म स्वीकारेल अशी धमकी रिहानाने दिली आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर बुधवारी महिलेची मदत करण्यासाठी हिंदू महासभेचे स्थानिक नेता जमालपूर येथे पोहोचले. त्यामुळे येथील वातावरणात आणखीनच तणाव निर्माण झाला. दरम्यान पोलीस वेळेवर पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.