नवी दिल्ली : लष्करी सेवेत असलेल्या मुस्लीम कर्मचाऱ्याने पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केला, तर त्याच्या निवृत्तीनंतर त्याची दुसरी पत्नीही माजी सैनिकांसाठी असलेल्या आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यास व पेन्शनमध्ये हिस्सा मिळण्यास पात्र ठरते, असा निकाल सशस्त्र सेनादल न्यायाधिकरणाच्या (एएफटी) दिल्लीतील मुख्य न्यायपीठाने दिला आहे. यामुळे मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या बहुपत्नीत्वाच्या प्रथेला मान्यता मिळाली आहे.निवृत्त लेफ्ट. कर्नल सरदार अहमद खान यांनी केलेली याचिका मंजूर करताना न्यायाधीकरणाच्या न्या. एस.एस. सतीशचंद्रन आणि एअर मार्शल जे. एन. बर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, अर्जदाराची दुसरी पत्नीही त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंबीय आहे, असे मानून तिलाही आरोग्यसेवांचा लाभ दिला जावा. तसेच आपल्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी अर्जदार दुसऱ्या पत्नीचेही नामनिर्देशन करू शकतो.सरदार अहमद खान यांनी निवृत्त झाल्यावर, पहिली पत्नी त्यांच्यासोबत नांदत असूनही, दुसरा विवाह केला. सेवेत असताना त्यांनी आरोग्यसेवा व पेन्शनसाठी पहिल्या पत्नीचे ‘नॉमिनी’ म्हणून नाव दिले होते. इस्लामी कायद्यानुसार दुसरा विवाह कायदेशीर असल्याने त्याने दुसऱ्या पत्नीसही ‘नॉमिनी’ करावे, असा अर्ज केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुस्लिम लष्करी कर्मचाऱ्याची दुसरी पत्नीही पेन्शनला पात्र
By admin | Published: August 27, 2016 6:11 AM