वाराणसी - आपल्याविरोधात फतवा जारी करणा-या दारुल उलूम देवबंदवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी मुस्लिम महिला संघटनेने केली आहे. रामाची आरती करत स्तुती केल्याबद्दल दारुल उलूम देवबंदने या संघटनेच्या महिलांविरोधात फतवा जारी करत यांना मुस्लिम म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं. महिला संघटनेने दारुल उलूम देवबंदला त्यांच्याच शब्दात उत्तर देत, बंदी घालण्याची मागणी केली असून त्यांच्या फंडिगची चौकशी व्हावी असंही म्हटलं आहे.
18 ऑक्टोबर रोजी संघटनेच्या महिलांनी रामाची आरती केली होती. यानंतर शनिवारी दारुल उलूम देवबंदने संघटनेच्या महिलांविरोधात फतवा जारी केला होता. 'ज्या महिलांनी चुकीचं कृत्य केलं आहे, त्यांनी त्याची भरपाई केलीच पाहिजे', असं फतव्यात सांगण्यात आलं होतं.
संघटनेच्या संस्थापक आणि अध्यक्ष नाजनीन अन्सारी यांनी सांगितलं आहे की, 'धार्मिक गोष्टींमध्ये आपला आदेश पाळण्याचा किंवा आपली मतं दुस-यांवर लादण्याचा अधिकार इस्लाम देत नाही. ते सल्ला देऊ शकतात. पण त्यांना एखाद्याला इस्लाममधून बेदखल करण्याचा अधिकार नाही. जर त्यांनी फतवा जारी करणं कायम ठेवलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करु'.
'मी मुस्लिम असल्याचा अभिमान आहे, आणि मी इस्लामचे सर्व नियम पाळते. एक खरी मुस्लिम म्हणून मी अशा फतव्यांसमोर झुकू शकत नाही', असं नाजनीन अन्सारी बोलल्या आहेत. नाजनीन अन्सारी गेल्या 11 वर्षांपासून रामाची मनोभावे पुजा-आरती करतात. फतवा जारी करण्यासाठी यांना 11 वर्ष का लागली याचं नाजनीन अन्सारी यांना आश्चर्य वाटत आहे. '2006 पासून आम्ही हिंदू सण साजरे करण्यास आणि आरती करण्यास सुरुवात केली होती. आपल्या राज्यघटनेने दिलेला हा आमचा मुलभूत अधिकार आहे', असं नाजनीन अन्सारी यांनी ठणकावून सांगितलं आहे.
फतवा जारी करण्याच्या या प्रक्रियेविरोधात आम्ही निदर्शन करणार असल्याचं नाजनीन अन्सारी यांनी सांगितलं आहे. जून 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने फतवा जारी करणं बेकायदेशीर असल्याचं सांगितलं होतं.