उज्जैन:उज्जैनमधील भगवान शंकराच्या महाकाल मंदिरात मुस्लिम तरुणाने प्रवेश केल्यावरुन मोठा गोंधळ झाला. गुरुवारी उज्जैनच्या महाकाल मंदिरात एका मुस्लिम तरुणाने प्रवेश केला आणि महाकालचे दर्शन घेतले. त्या तरुणाचा डोक्यावर गोल टोपी आणि मुस्लिम पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर संतांनी आणि हिंदू भाविकांनी यावर आक्षेप नोंदवला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी उज्जैनच्या महाकाल मंदिरात महाराष्ट्रातील एका मुस्लिम तरुणाने प्रवेश केला. हा मुस्लिम तरुण स्वतःला भगवान महाकालचा मोठा भक्त असल्याचे सांगतो. दरम्यान, त्या तरुणाचा टोपी घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. फोटो व्हायरल झाल्यानंतर संतांनी त्याच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेतला. वाढता वाद पाहून मंदिर समितीने त्या मुस्लिम भाविका समोर आणले आणि त्याचा एक व्हिडिओ संदेशही जारी केला. यानंतर हे प्रकरण शांत झाले.
जुनैद हा महाकालचा जुना भक्त आहे
महाकाल मंदिरात प्रवेश केलेल्या तरुणाचे नाव जुनेद इद्रिस शेख आहे. मंदिराचे पुजारी बाला गुरू यांनी सांगितले की, तो महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो त्याचे मित्र शम्मी जैस्वाल आणि श्याम कुमार यांच्यासोबत अनेक वर्षांपासून महाकाल मंदिरात येत आहे. तो मंदिराचे सर्व नियम पाळतो आणि दानही देतो. आजही जुनेद इद्रिस शेख हा त्याच्या मित्रांसोबत मंदिरात दर्शनासाठी आला होता.
मंदिर सर्वांसाठी खुळेमंदिर व्यवस्थापनाने पुढे सांगितले की, मंदिरात सर्व धर्माचे अनेक अनुयायी दर्शनासाठी येतात. बाबांचा दरबार सर्वांसाठी खुला आहे. अनेकवेळा सोशल मीडियावर काही समाज कंटक अशाप्रकारचे फोटो व्हायरल करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, मंदिराचे प्रशासक गणेश धाकड यांनी जुनैद याच्यसह त्याच्या मित्रांचा महाकालाचे वस्त्र आणि प्रसाद देऊन सन्मान केला.