भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून हिणवणाऱ्यांना तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेचा कायदा सरकारने करावा, अशी मागणी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी केल्यानंतर हिंदुत्त्ववादी नेते आक्रमक झाले आहेत. ओवेसींच्या या वक्तव्यानंतर भाजपा खासदार विनय कटियार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुस्लिमांना या देशात राहण्याचा हक्कच नसल्याचे म्हटले. मुस्लिम लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. मग मुस्लिमांनी भारतात राहण्याची आवश्यकताच काय आहे?, असा सवालही कटियार यांनी उपस्थित केला.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांच्या बाजूने कायदा तयार करण्याची मागणी बुधवारी लोकसभेत केली. त्यांनी म्हटले की, असा कायदा आणला गेला पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही भारतीय मुस्लिमाला पाकिस्तानी संबोधल्यास तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद असावी. पण केंद्रातील भाजपा सरकार असं कोणतंही विधेयक आणणार नाही'. पुढे ते बोललेत की, 'भारतात जे मुस्लिम आहेत त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या दोन राष्ट्रांचा सिद्धांत नाकारला आहे. पण आजही भारतीय मुस्लिमांना बाहेरचं समजलं जाते, असे ओवेसी यांनी म्हटले.