नवी दिल्ली: देशात भाजपचे सरकार आल्यापासून विरोधकांकडून अनेकदा मुस्लिम/अल्पसंख्यांक धोक्यात आहे किंवा त्यांना भीती वाटते, असे म्हटले जाते. मोदी सरकारची धोरणे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करतात, त्यामुळे मुस्लिमांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर इंडिया टुडेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
स्मृती इराणींचा विरोधकांना टोला
मुस्लिम समाजात किंवा अल्पसंख्याक समाजात भीती निर्माण केली जात आहे, या प्रश्नावर स्मृती इराणी यांनी आपल्याच देशात कोणीही अल्पसंख्याक कसा असू शकतो, असा टोला लगावला. कायदा सर्वांसाठी समान आहे. संविधान आणि कायद्यानेच देश चालतो. कोणत्याही समाजाच्या मनात कधीही वेगळेपणाची भावना नसावी. त्यांच्या कपड्यांवरुन किंवा इतर गोष्टीवरुन कोणाचाही जज करू नका. प्रत्येकाने भारतीय म्हणून पाहिले पाहिजे.
मी स्वत: एका अशा व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्याच्या समुदायाची लोकसंख्या संपूर्ण जगात फक्त 55 हजार आहे. माझे पारशी कुटुंबीय म्हणतात की, आपण आपल्याच देशात अल्पसंख्याक कसे असू शकतो. हे एकून मला खूप आनंद होतो. म्हणूनच सर्व भारतीय आहोत, या भावनेने आपण पुढे गेले पाहिजे, असं स्मृती इराणी म्हणाल्या.
यावेळी मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा सर्व समाजांना मोठा फायदा झाला आहे, यावरही केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. मग ते आयुष्मान भारत बद्दल असो किंवा मोफत रेशन देण्याचा विषय असो किंवा घरांमध्ये शौचालये देण्याचा विषय असो. या योजनांचा लाभ प्रत्येक समाजाला मिळाला आहे, असंही इराणी यावेळी म्हणाल्या.
राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोलयावेली त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही टोमणा मारला. लंडनमध्ये दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावर म्हणाल्या, आपल्या देशात प्रत्येक आई आपल्या मुलांना म्हणथे की, घरात भांडण करा, बाहेर नका करू. राहुल गांधींनी काय केले? एक भारतीय म्हणून मी त्या गोष्टीला अजिबात स्वीकारू शकत नाही. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशावेळी बाहेर जाऊन अशी विधाने केली जातात. सभागृहात गैरहजर राहणाऱ्या खासदारांबद्दल काय बोलायचं... असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.