वाराणसी - उत्तर प्रदेशातील बैरिया भाजपाआमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मुस्लीस समुदायावर सुरेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुस्लिमांमध्ये 50 बायका केल्या जातात त्यांना 1050 मुलं होतात हे परंपरा नसून प्राण्यांची वृत्ती आहे असं विधान भाजपाआमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.
सुरेंद्र सिंह यांनी पहिल्यांदाच असं विधान केलं आहे असं नाही. यापूर्वीही अनेकदा सुरेंद्र सिंह विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या दरम्यान सुरेंद्र सिंह यांनी मायावती यांच्यावर टीका करताना पातळी सोडून शब्द प्रयोग केले होते. मायावती रोज फेशियल करतात. 60 वर्षाच्या असूनही त्या अजून तरुण आहे असं दाखविण्याचा प्रयत्न करतात असं बोलले होते.
तर 2019 ची निवडणूक इस्लाम विरुद्ध भगवान अशी होणार आहे. विरोधी पक्ष राष्ट्रविरोधी आहेत. या निवडणुकीत भारताच्या नागरिकांनी निर्णय घ्यायचा आहे की इस्लाम जिंकणार की देव जिंकणार असं विधान सुरेंद्र सिंह यांनी केलं होतं.
तसेच एका बलात्काराच्या प्रकरणातही आमदार सुरेंद्र सिंह यांनी मनोवैज्ञानिकांच्या नजरेतून पाहिलं तर तीन मुलांच्या आईसोबत कोणी अश्लिल कृत्य करेल का? आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर ते बोलत होते. यामध्ये पीडित महिलेची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्यांनी केली होती.
सुरेंद्र सिंह यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच असून पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या अनेक नेत्यांकडून बऱ्याचदा वादग्रस्त विधाने दिली गेली. त्यामुळे निवडणुकीत भाजपा अडचणीत आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपाच्या नेत्यांना माध्यमापासून आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही भाजपा आमदारांकडून अशाप्रकारे एका समाजाला टार्गेट करण्यासाठी विधानं केली जात आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त विधानावरुन नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.