जयपूर : गोहत्येवरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जयपूर येथील मुस्लिम एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेयर सोसायटीने गायींची देखभाल करण्याचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या सोसायटीने बिकानेर मार्गावर आदर्श मुस्लिम गोशाळा स्थापन करून भाकड, वृद्ध आणि आजारी गायींची काळजी घेण्याचे काम हाती घेतले आहे.ही गोशाळा या विभागातील सर्वांत मोठी आणि जोधपूरच्या मुस्लिम एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेयर सोसायटीद्वारे संचालित केली जाणारी एकमेव गोशाळा आहे. या गोशाळेत २०० च्यावर गायी आहेत. येथे पशुवैद्यकांच्या पथकातर्फे या गायींची काळजी घेती जाते. शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारी ही गोशाळा मागील आठ वर्षांपासून चालत आहे. ‘गायींची काळजी घेणे म्हणजे आईची काळजी घेण्यासारखे आहे. गोपालन हा भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचाही एक भाग आहे,’ असे सोसायटीचे सरचिटणीस आणि शिक्षणतज्ज्ञ हाजी मोहम्मद आतिक म्हणाले.आतिक हे दररोज दुपारची नमाज अदा केल्यानंतर आपल्या कारने गोशाळेत येतात आणि गायींची सेवा करतात. या गायींसाठी दररोज जोधपूरच्या लुनी तालुक्यातील बाजारातून ताजा चारा ट्रकने आणला जातो. (वृत्तसंस्था)संपूर्ण शहरामधून भाकड, वृद्ध आणि आजारी गायी गोशाळा पथकातर्फे येथे विशेष वाहनांमधून आणण्यात येतात. बहुतांश गायी या त्यांच्या मालकांनी त्या भाकड, वृद्ध वा आजारी झाल्यामुळे बेवारस सोडून दिलेल्याच असतात. ‘शहरांत राहणारे आमचे सदस्य अशा मोकाट सोडण्यात आलेल्या व बेवारस गायींवर लक्ष ठेवतात आणि त्यांना गोशाळेत आणतात. येथे या गायींची पूर्ण काळजी घेण्यात येते,’ असे मोहंमद आतिक म्हणाले. आतिक आणि त्यांचे सहकारी या गायींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात.
भाकड व वृद्ध गायींसाठी राजस्थानमध्ये मुस्लिमांची गोशाळा
By admin | Published: March 07, 2016 11:18 PM