ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. १६ - मुसलमान या देशात राहू शकतात पण यासाठी त्यांना बीफ सोडावे लागेल कारण भारतात गाय ही श्रद्धा व आस्थेचे प्रतिक आहे असे वादग्रस्त विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या विधानावर आता विरोधकांकडून टीकेची झोड सुरु आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला शुक्रवारी मुलाखत दिली आहे. यामध्ये बीफवरुन सुरु असलेल्या वादाविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर खट्टर म्हणाले, भारतातील बहुतांशी लोकांची गायीवर आस्था आहे आणि मुस्लिम बीफ खाणे सोडून धार्मिक विश्वास तोडणार नाहीत. पण मुस्लिमांना या देशात राहायचे असेल तर त्यांना बीफ सोडावेच लागेल कारण इथे गोमातेला मानले जाते असे त्यांनी नमूद केले. दादरीतील हत्या ही गैरसमजातून घडलेली घटना असून अशी घटना घडायला नको असेही त्यांनी म्हटले आहे. कोणी काय खावे यावर निर्बंध आणून संविधानाचे उल्लेख होत नाही का असा सवाल विचारला असता खट्टर म्हणतात, एखाद्याने बीफ खाल्ल्याने दुस-या धर्माच्या भावना दुखावणार असतील तर हे संविधानाचे उल्लंघन ठरते.