नवी दिल्ली – भारतात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. अनेक ठिकाणी हिंदु-मुस्लीम ऐक्याचं उदाहरण पाहायला मिळतं. देशात हिंदु-मुस्लीम धर्माचं राजकारणही दिसून येतं. परंतु सर्वसामान्य हिंदु-मुस्लीम नेहमी एकमेकांच्या मदतीला धावून जातात याची प्रचिती राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा दिसून आली आहे. दिल्लीतील जामिया नगर येथील एका मंदिराचं संरक्षण करण्यासाठी मुस्लिमांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि त्या कायदेशीर लढाईत जिंकले.
जमिनीवर कब्जा करण्याच्या उद्देशाने काहींनी मंदिराशेजारील धर्मशाळेचा काही भाग तोडला होता. त्याविरोधात जामिया नगर कमिटीचे अध्यक्ष सैय्यद फौजुल अजीम यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. याठिकाणी न्या. संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने ले-आऊन प्लॅननुसार जमिनीवर मंदिर असून याठिकाणी अतिक्रमण करण्याची परवानगी नाही असं सांगितले. तसेच हायकोर्टाने दिल्ली सरकार, पोलीस आयुक्त आणि जामिया नगरचे प्रभारी यांना आदेश दिलाय की, भविष्यात मंदिर परिसरात कुठेही अतिक्रमण होऊ नये. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये याची काळजी घ्यावी.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात सैय्यद फौजुल अजीम यांचे वकील नितीन सलूजा यांनी कोर्टात सांगितले की, मंदिराच्या धर्मशाळेला रातोरात जमीनदोस्त करण्यात आलं. बिल्डर या जागेवर अतिक्रमण करत आहेत. त्याशिवाय धर्मशाळेवरील तोडक कारवाईचे फोटो सादर केले. दिल्ली सरकारच्या शहरी विकास वेबसाईटवरील ले-आऊट प्लॅनचा हवालाही देण्यात आला. ज्यात नूर नगर एक्सटेंशन जामिया नगरच्या जागेवर मंदिर असल्याचं दाखविण्यात आलं आहे.
तर जामिया नगर येथील मंदिर आणि धर्मशाळेचे जमीन माखनलालचे पुत्र जौहरीलालची आहे. या मंदिराचं बांधकाम १९७० मध्ये झालं होतं. मुस्लीम बहुल भाग असूनही याठिकाणी ५० वर्षापेक्षा जास्त काळ लोकं पूजा करत आहेत. या भागात केवळ ४०-५० कुटुंब राहतात. मंदिराची देखभाल करणारेच धर्मशाळा आणि मंदिर तोडण्याचा डाव रचत होते. या परिसरात रहिवाशी कॉम्प्लेक्स बनवण्याची त्यांची इच्छा होती. सौय्यद फौजुल अजीम यांनी २० सप्टेंबरला याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु कारवाई न झाल्याने त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले.