नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर कर्नाटक काँग्रेसमधील नेते रोशन बेग यांनी सोमवारी पक्ष सोडण्याचे संकेत दिले. यावेळी त्यांनी मुस्लिमांना एक संदेश दिला. मुस्लिमांनी भाजपला सामील होण्याचे आवाहन बेग यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील काडाडून टीका केली.
देशात एनडीए पुन्हा एकदा सत्तेत परतल्यास मुस्लीम बांधवांनी भाजपशी जुळवून घ्यावे ही नम्रतेचे आवाहन मी करतो, असंही बेग म्हणाले. तसेच गरज भासल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील व्हावे, असंही त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्यात काँग्रेसने केवळ एका मुस्लीम व्यक्तीला तिकीट दिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
मुस्लीम बांधवांनी कोणत्याही एका पक्षासोबत निष्ठा ठेवू नये. त्यामुळे भाजपशी जुळवून घ्यावे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मुस्लिमांना न्याय दिला नाही. तसेच आपण येणाऱ्या काळात काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत दाखविण्यात आले आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दाखवले आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. तर काहींच्या मते एक्झिट पोलच्या विरुद्ध निवडणुकीचा निकाल लागले.