ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ७ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ड़ॉ. मोहन भागवत यांनी चिनी वस्तूंवर बंदी टाकण्याचे आवाहन केले असतानाचा लखनौमधील मौलाना खालिद रशीद महली यांनीदेखील मुसलमानांनी चिनी वस्तू वापरु नये असे विधान केले आहे. मुसलमानांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून इस्लाम धर्माविषयी असलेले गैरसमज दूर करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
लखनौमधील ऐशबाग ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महली सोमवारी एका कार्यक्रमात बोलत होते. खालिद महली म्हणाले, चीन ज्यापद्धतीने वारंवार भारतामध्ये घुसखोरी करत आहे ते राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. चिनी वस्तूंमुळे भारतातील लघु व कुटीर उद्योग धोक्यात आले आहे. चिनी वस्तूंनी भारतीयांचा रोजगार धोक्यात आणल्याने सर्वांनीच विशेषतः मुसलमानांनी चिनी वस्तू वापरु नये असे आवाहन त्यांनी केले. चीनला आर्थिक झटका देण्याची हीच योग्य पद्धत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
इस्लाम धर्म हा नेहमीच मानवतेचा रक्षक आहे. मुसलमानांनी सोशल मिडीयाचा वापर करुन या धर्माविषयी पसरलेले गैरसमज दूर करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.