ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - जामिया मिल्लिया इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये राष्ट्रीय मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत राष्ट्रीय स्वयंसेवक नेता इंद्रेश कुमार यांनी उपस्थिती लावली होती. मात्र त्यांनी इफ्तार पार्टीत केलेल्या भाषणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. इंद्रेश कुमार यांनी इफ्तार पार्टीतच मुस्लिमांना घरात तुळशीचं रोपटं लावायला सांगितलं, तसंच मांसाहार न करण्याचा सल्लाही देऊन टाकला.
"पैगंबर अब्राहमने सांगितल्यानुसार मांस खाण्यापासून लांब राहिलं पाहिजे. जे लोक मांस खातात, हत्या करतात किंवा विकतात ते लोक आजाराला निमंत्रण देतात", असं आरएसएस नेता इंद्रेश कुमार बोलले आहेत. यावेळी इंद्रेश कुमार यांनी "मुस्लिमांनी आपापल्या घरी तुळशीचं रोपटं लावलं पाहिजे, जेणेकरुन तुळस रोज पाहिल्याने त्यांना जन्नत मिळेल", असा सल्लाही दिला.
विशेष म्हणजे जेव्हा इंद्रेश कुमार आपल्या भाषणात हे सगळं सागंत होते तेव्हा इफ्तार पार्टीत आलेल्या लोकांना चिकन बिर्याणी वाढली जात होती.
Prophet and his family never consumed meat. They used to say meat is a disease and milk is a cure: Indresh Kumar,RSS pic.twitter.com/qDNU6kiQ3f— ANI (@ANI_news) June 6, 2017
काही विद्यार्थ्यांनी मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या इफ्तार पार्टीत इंद्रेश कुमार यांना बोलावण्याचा विरोध केला होता. या विद्यार्थ्यांची पोलिसांसोबत झडपदेखील झाल्याचा आरोप आहे. आपल्यातील एका विद्यार्थ्याला पोलिसांना ताब्यात घेतल्याचं विरोध करणा-या विद्यार्थ्याने सांगितलं आहे.
विरोध करणा-या विद्यार्थ्यांची माहिती मिळाल्यानंतर इंद्रेश कुमार बोलले की, "देव यांना माफ करो यासाठी मी प्रार्थना करेन". "विरोध करणा-या विद्यार्थ्यांनी मुस्लिमांच्या प्रगतीसाठी काम केलं पाहिजे", असंही ते बोलले आहेत. तसंच त्यांनी आपल्याला दगड, बंदूक किंवा पाकिस्तानचा झेंडा नाही तर भारताचा झेंडा पाहिजे अशा घोषणा दिल्या पाहिजेत असंही बोलले आहेत.