नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला मंजुरी दिल्यानंतर आता १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. मात्र, कोरोना लसीसंदर्भात मुस्लिम समाजाकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदाराने केले आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सरधानाचे आमदार संगीत सिंह सोम यांनी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, कोरोना लसीकरणावर उपस्थित केले जाणारे प्रश्न दुर्दैवी आहेत. देशातील काही मुस्लिम बांधवांना कोरोना लसीवर विश्वास नाही. त्यांचा शास्त्रज्ञ, पोलीस आणि पंतप्रधानांवरही विश्वास नाही. त्यांना पाकिस्तान अधिक जवळचा वाटतो. कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे. मात्र, शास्त्रज्ञांच्या मेहनतीवर शंका घेऊ नये, असे संगीत सिंह सोम यांनी म्हटले आहे.
यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कोरोना लसीला भाजपची लस असल्याचे म्हटले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोना लस ही आरोग्य कर्मचारी यांना देण्यात असून, याचा खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे.
तत्पूर्वी, जागतिक स्तरावरही मुस्लिमांनी कोरोना लसींमध्ये डुकराची चरबी असल्याचा दावा करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर स्पष्टीकरण देताना लसीची निर्मिती आणि उत्पादन करताना कोणत्याही प्रतिबंधित गोष्टींचा वापर केला जात नाही, असे सांगितले आहे.