नवी दिल्ली : महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशा ट्रिपल तलाकच्या (झटपट मौखिक तलाक) मुस्लीम समाजात रूढ असलेल्या प्रथेचा त्या समाजातील विचारमंथनाने आणि प्रबोधनानेच त्याग होऊ शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.१२ व्या शतकातील तत्त्वचिंतक व समाजसुधारक बसवप्पा यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना मोदींनी ट्रिपल तलाकचा उल्लेख केला व ही प्रथा सक्तीने व संघर्षातून बंद करण्यास सरकार अनुकूल नाही, असे संकेत त्या वेळी केलेल्या वक्तव्यातून दिले. मुुस्लीम समाजाने या विषयात (इतरांना) राजकारण आणू न देता स्वत:च यातून मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी केले.मुस्लीम समाजातील ट्रिपल तलाक, हलाला व बहुपत्नीत्व या प्रथांच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात मे महिन्याच्या सुटीत घटनापीठापुढे सुनावणी होणार असल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुस्लिमांचा हा धर्मशास्त्राशी संबंधित व्यक्तिगत मामला आहे व न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने घेतली आहे. केंद्र सरकारने मात्र मुस्लिमांमधील ही प्रथा राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाची पायमल्ली करणारी व महिलांची मानखंडना करणारी आहे, असे मत नोंदविले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)पंतप्रधान मोदी म्हणाले... ‘मै मुस्लीम समाजसे आग्रह करुंगा की ट्रिपल तलाक के मुद्दे को राजनीती के दायरे मे मत आने दीजिये. आप लोग आगे आके इसका समाधान कीजिये.’ मुस्लीम समाजातील प्रबुद्ध लोक पुढे येतील व मुस्लीम महिला, यामुळे सोसाव्या लागणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्वत: लढा देऊन केव्हा ना केव्हा यातून मार्ग काढतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. सामाजिक प्रबोधनाची गरज...काही दिवसांपूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही मोदींनी ट्रिपल तलाकवर भाष्य केले होते व तेव्हाही त्यांचा रोख हा विषय संघर्षाने नव्हे तर सामोपचाराने व प्रबोधनाने सोडविण्याचाच होता. ती बैठक माध्यमांना खुली नव्हती. मात्र नंतर रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मोदी असे म्हणाल्याचे सांगितले होते की, आपल्या मुस्लीम भगिनींनाही न्याय मिळायला हवा. कोणाचीही पिळवणूक होता कामा नये. यावरून मुस्लीम समाजात संघर्ष व्हावा, असे आम्हाला वाटत नाही. अशा सामाजिक कुप्रथांविरुद्ध सामाजिक प्रबोधन करून मुस्लीम महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल.
ट्रिपल तलाकवर मुस्लीम स्वत:च मार्ग काढतील!
By admin | Published: April 30, 2017 5:41 AM