नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. जवळपास दीड महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. 15 जानेवारीला शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये नवव्यांदा बैठक होईल. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
"शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक" असल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच "केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनावश्यक चर्चेत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा प्रयत्न निरर्थक आहे. देशातील अन्नदाता सरकारचा उद्देश जाणत असून त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे कृषी विरोधी कायदे मागे घ्या" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी नेते पहिल्या बैठकीपासून त्यांच्या या मुख्य मागणीवर ठाम आहेत. तर कायदे मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर सरकार ठाम नाही. त्यामुळेच आतापर्यंतच्या बैठकांमधून तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत सरकार कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत घरी परतणार नाही, असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. तर कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत. सरकारनं केलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. यामुळे अडत्यांची भूमिका संपेल आणि शेतकरी त्यांचा शेतमाल कुठेही विकू शकतील, असं सरकारचं म्हणणं आहे.
"मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्यांचा घेतला जीव"
"मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला" असं म्हणत याआधीही काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं होतं. "मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशी क्रूरता फक्त विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा" असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी मोदी सरकार हट्ट सोडा हा हॅशटॅग देखील वापरला होता.