नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या धर्तीवर कारवाई करत, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानच्या ३ सैनिकांना कंठस्नान घातले व त्यांची एक सीमाचौकीही उद्ध्वस्त केली. या कारवाईत पाकिस्तानचा आणखी एक सैनिक जखमी झाला.गेल्या शनिवारी काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, सीमेपलीकडून निष्कारण केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्यासह ४ सैनिकांना हौतात्म्य आले होते. पाकिस्तानच्या या दुष्कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने त्यांच्या हद्दीत घुसून ही जबाबी कारवाई केली.लष्कराच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, पूंछ ब्रिगेडच्या २५व्या डिव्हिजनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे २००-३०० मीटर आत घुसून पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोट भागातील रुख चक्री येथे हा हल्ला केला. तेथे असलेली पाकिस्तानी लष्कराच्या ५९ बलूच रेजिमेंटची एक सीमाचौकी उद्ध्वस्त केली. सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या या कारवाईसाठी ४-५ तरबेज ‘घटक कमांडो’ पाठविण्यात आले. कामगिरी फत्ते करून ते सुखरूप परत आले. या हल्ल्यात आपले ३ सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानी सैन्यदलांच्या प्रसिद्धी विभागानेही मान्य केले. मात्र, कदाचित याहून अधिक शत्रूसैनिक ठार झाले असावेत, अशी शक्यता गुप्तहेर सूत्रांनी वर्तविली.> कोण हा नूर मोहम्मद?नूर मोहम्मद २००३ मध्ये दिल्लीतील एका प्रकरणात दोषी ठरला होता आणि श्रीनगरच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. २०१५ मध्ये तो पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर, तो दक्षिण काश्मीरच्या त्रालमध्ये राहत होता. या भागात जैश-ए-मोहम्मदचा तो महत्त्वाचा सदस्य बनला.जुलै २०१७ मध्ये झालेल्या अरिपाल चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे ३ अतिरेकी मारले गेले. त्यानंतर, नूर भूमिगत झाला. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तो वाँटेड होता. श्रीनगरच्या विमानतळाजवळील बीएसएफच्या शिबिरावरील हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता.>जैशचा ४ फुटी अतिरेकी चकमकीत ठारश्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफ कॅम्पवर आॅक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या नूर मोहम्मद तांत्रे (४७) हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला. नूर मोहम्मदच्या शोधात असताना मिळालेल्या गुप्त सूचनेनंतर पोलिसांनी सांबुरा भागात एका घराला सोमवारी रात्री घेरले. रात्रभर चकमक सुरू होती. त्यात नूर मोहम्मद मारला गेला असून, मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह जवानांनी ताब्यात घेतला. मात्र, त्याच्यासोबत रात्रभर चकमकीत सहभागी असणारे २ दहशतवादी पळून गेले. नूर मोहम्मद उर्फ नूर तराली हा सुरक्षा दलासाठी डोकेदुखी बनला होता. काश्मीर खो-यात अशांतता पसरविण्यात त्याचा मोठा हात होता.>भारताविरोधी घोषणानूर मोहम्मद ठार झाल्याचे वृत्त पसरताच काश्मीरमध्ये शेकडोे तरुण रस्त्यावर उतरून भारतविरोधी घोषणा देऊ लागले. सुरक्षा जवानांवर त्यांनी दगडफेकही केली. त्यामुळे जवानांना त्यांच्यावर अश्रुधूर सोडावा लागला.
पीओकेमध्ये घुसून तीन सैनिकांचा खात्मा, मेजर मोहरकर यांच्या हौतात्म्याचा बदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 5:40 AM